कासारवर्णे येथील ओहोळात मोपा विमानतळाचे पाणी.. रानटी जनावरांचा धोका…

कासारवर्णे येथील ओहोळात मोपा विमानतळाचे पाणी.. रानटी जनावरांचा धोका…
पेडणे : पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथील डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात मोपा विमानतळाचे पाणी वाहत असल्यामुळे येथील ओहळाची रुंदी वाढून तो दरीसारखा झाला आहे. यामुळे ओहळाच्या काठावरची झाडे उपटून पडत आहेत. तसेच पाळीव व रानटी जनावरांसह शेतकऱ्यांना ओहळ ओलांडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येथील पारंपरिक जंगलवाटाही बंद होण्याच्या मार्गावर असून लवकरच रानटी जनावरे गावाकडे वळण्याची शक्यता आहे.
या भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात दगडधोंडे येत असून भविष्यात शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, उपजिल्हाधिकारी पेडणे यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग, कृषी विभाग, जैवविविधता समिती, जलसंपदा विभाग (WRD), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित ग्रामपंचायती यांची तात्काळ संयुक्त बैठक घेणे आवश्यक आहे, जेणेकरून उर्वरित डोंगरशेती वाचवता येईल.
उपाययोजना म्हणून, मोपा विमानतळावरून येणाऱ्या पाण्याकरिता GMR कंपनीकडून संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. जर हे शक्य नसेल, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अनिवार्य आहे. विविध खात्यांमधील जबाबदार अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.