वझरे तळेखोल येथील पूल ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण अवस्थेत..

वझरे तळेखोल येथील पूल ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण अवस्थेत..
दोडामार्ग :- वझरे तळेखोल मार्गावर होत असलेला पूल हा ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे आणि बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण अवस्थेत आहे, दोन दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावासामुळे सदर या ठिकाणी केलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे तळेखोल विर्डी आदी गावातील लोकांचा दळण वळणाचा मार्ग बंद झाला त्यांचा तालुक्यापासुन संपर्क तुटला याला बांधकाम विभाग पूर्णतः जबाबदार असून सोमवार पर्यंत या पुलाचा पर्यायी रस्ता पुन्हा करून वहातूक सुरु न केल्यास मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे. त्याअगोदर त्यांनी बांधकाम विभागात जावून तेथील अधीकाऱ्यांना धारेवर धरले.
सगळेच ठेकेदार हे सत्ताधाऱ्याच्या गटातील आहेत, यावर ना बांधकाम विभागाचा वचक आहे ना कोणत्याही लोकप्रतिधीचा,यामुळे हे ठेकेदार “हम करे सो कायदा” या तत्वाने वागत आहेत. कोणत्याही विकासकामाला १५ मे ही डेडलाईन असते मात्र तालुक्यात अजून कोणाच्या आशीर्वादाने कामे सुरु आहेत, हे कळायला मार्ग नसल्याचे बाबुराव धुरी म्हणाले, उसप येथे एक मुजोर ठेकेदार असाच काम करत आहे, ऐन पावसात त्याने कॉजवे वजा पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे, हे ठेकेदार व संबंधित विभाग यांचे मिलीभगत असल्याचे उत्तम उदाहरण असल्याचेही श्री. धुरी म्हणाले.
दोडामार्ग तालुक्यात वीज प्रश्ना बाबत जी आंदोलने करावी लागतात, रोज जाऊन वीज वितरणला जाब विचारावा लागतो हा सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पुरावा असून जसे काम आमदार असताना मालवण -कुडाळ मतदार संघात वैभव नाईक यांनी केले व भूमिगत वीज वाहिन्या टाकून तिथला वीज प्रश्न सोडवला तसें काम गेली तीन टर्म आमदार असलेले दीपक केसरकर यांनी केले असते तर तालुका वासियांवर चार – चार दिवस काळोखात राहाण्याची वेळ आली नसती, त्यामुळे वीज वितरणला जाब विचारण्या अगोदर आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी वीज प्रश्नावर काय कार्य केले ते तपासा असा सल्लाही त्यांनी वीज प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना दिला आहे.