भारतासाठी ‘S-400’ एअर डिफेन्स सिस्टम ठरत आहे ‘सुदर्शन चक्र’

भारतासाठी ‘S-400’ एअर डिफेन्स सिस्टम ठरत आहे ‘सुदर्शन चक्र’
भारताकडे असलेली रशियन बनावटीची S-400 एअर डिफेन्स सिस्टम शत्रुराष्ट्रांच्या नापाक योजना हाणून पाडण्याचे काम करत आहे. पाकिस्तानने भारतावर केलेले अनेक हवाई हल्ले या प्रणालीने वेळेत ओळखून निष्फळ ठरवले आहेत.
S-400 प्रणाली एकाचवेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची क्षमता असलेली आहे. यात एकात्मिक मल्टीफंक्शन रडार प्रणाली आहे, जी शत्रूच्या क्षेपणास्त्रांना ओळखून त्यांचा नाश करू शकते. या प्रणालीची रडार रेंज 600 किलोमीटर आणि क्षेपणास्त्र रेंज 40 ते 400 किलोमीटर दरम्यान आहे. केवळ 5 ते 10 मिनिटांत तैनात होणारी ही प्रणाली एकाचवेळी 80 लक्ष्यांवर प्रहार करू शकते.
S-400 प्रणाली रशियाने विकसित केली असून, रशियाबरोबरच चीन, तुर्की आणि भारताकडेही ही प्रणाली आहे. भारताने 2018 मध्ये 5.4 अब्ज डॉलर्स खर्च करून पाच S-400 युनिट्स खरेदी केली होती.
या प्रणालीच्या मदतीने भारताने पाकिस्तानचे दोन JF-17 आणि एक F-16 फायटर जेट पाडले. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असलेले त्यांचे AWACS विमानही निष्प्रभ झाले. जम्मूमधील हवाई पट्टीवर पाकिस्तानने रॉकेट हल्ला केला होता, पण S-400 ने तो हल्ला वेळेत निष्फळ केला. भारताने हवेतच आठ पाकिस्तानी क्षेपणास्त्रं उद्ध्वस्त केली.
भारतीय नौदलानेही ‘ऑपरेशन सिंदूर-2’ अंतर्गत कराची बंदरावर एक धाडसी आणि यशस्वी कारवाई केली. INS विक्रांत नेतृत्वाखालील कॅरिअर स्ट्राइक ग्रुपने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईहून कार्यरत असलेला पश्चिमी नौदल बेडा पूर्णपणे सज्ज आहे.
जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैन्य तळांवर पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. मात्र, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले तत्काळ निष्प्रभ केले आणि कोणतीही हानी होऊ दिली नाही.
या पार्श्वभूमीवर भारताने लाहोर, सियालकोट, कराची आणि इस्लामाबादवर जोरदार प्रत्युत्तर दिले. जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील सीमावर्ती शहरांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.