Uncategorized
महिलांच्या तस्करी प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला बेंगळुरू (कर्नाटक) येथे अटक

महिलांच्या तस्करी प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला बेंगळुरू (कर्नाटक) येथे अटक
पणजी :- गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला परदेशी महिलांच्या तस्करी प्रकरणात मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील दुसऱ्या मुख्य आरोपीला बेंगळुरू (कर्नाटक) येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव झोहेर अहमद खालिदी असून, ही कारवाई ७ मे २०२५ रोजी करण्यात आली. त्याला लवकरच गोव्यात आणण्यात येणार आहे.
या प्रकरणात यापूर्वी नॅन्सी किंग’ओरी उर्फ अलीयन केनियाची नागरिक, हिला अटक करण्यात आली होती. ती या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटची मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
३ मार्च २०२५ रोजी, एका केनियन महिलेने गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, नॅन्सीने तिला भारतात हॉटेलमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणले. मात्र, येथे पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेऊन जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले गेले.
तपासादरम्यान, नॅन्सीने पीडितेला UPI स्कॅनर दिला होता, ज्याद्वारे ग्राहकांकडून पैसे स्वीकारले जात होते. या स्कॅनरशी संलग्न असलेले बँक खाते झोहेर अहमद खालिदीच्या नावावर असल्याचे उघड झाले.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कर्नाटकात जाऊन शोधमोहीम राबवत झोहेरला ताब्यात घेतले. तो या आंतरराज्यीय मानव तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा संशय आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशाल पी. एन. देसाई उपअधीक्षक राजेश कुमारआणि पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांकडून या टोळीच्या अन्य सदस्यांचा शोध सुरू असून, लवकरच आणखी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे