पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ ठार, १३ जखमी…
सुरक्षा संबंधित मंत्रिमंडळ समितीची महत्त्वपूर्ण बैठक

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ ठार, १३ जखमी…
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) :- येथे मंगळवारी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा तात्काळ रद्द करून दिल्लीला परत येत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला आहे. आज ते सुरक्षा संबंधित मंत्रिमंडळ समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्री आज पहलगाम दौऱ्यावर जाणार असून, घटनास्थळी पाहणी करतील. हल्लेखोरांच्या शोधासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिस संयुक्तपणे सर्च ऑपरेशन राबवत आहेत. आर्मीची विक्टर फोर्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे जवान या मोहिमेत आघाडीवर आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या TRF या मुख्य संघटनेने स्वीकारली आहे.
या हल्ल्यात आयबी अधिकारी मनीष रंजन यांना त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलांसमोर गोळी झाडण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते सावरू शकले नाहीत. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी सैन्याची वर्दी परिधान केली होती, त्यामुळे बैंसरन खोऱ्यात सुट्टी घालवत असलेल्या नागरिकांना कुठलाही संशय आला नाही. त्यामुळेच दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर हल्ला करता आला. मनीष रंजन यांची पत्नी आणि मुले मात्र सुखरूप बचावली आहेत.
पंतप्रधान दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेतली.
अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांसाठी मदत केंद्र स्थापन केले असून, कोणत्याही माहिती किंवा मदतीसाठी ९५९६७७७६६९, ०१९३२२२५८७० या फोन क्रमांकांवर किंवा ९४१९०५१९४० या व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी ही माहिती सोशल मीडिया एक्सवरून दिली आहे.