देशभरातील हवामान बदलतंय, महाराष्ट्रात उष्णतेचा कहर की अवकाळीचा तडाखा ?

देशभरातील हवामान बदलतंय, महाराष्ट्रात उष्णतेचा कहर की अवकाळीचा तडाखा ?
सिंधुदुर्ग :- देशातील हवामान पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा हायअलर्ट जारी केला आहे. तर महाराष्ट्रासाठी विशेष उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या उत्तर भारतात सायक्लोनिक सर्कुलेशनमुळे मोठ्या प्रमाणावर हवामानात अस्थिरता निर्माण झाली आहे. हवामान विभागानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र दिल्लीमध्ये केवळ ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता नाही.
पूर्व भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे मुसळधार पावसाचा जोर असणार आहे. विशेषतः 22 एप्रिल रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडू या राज्यांनाही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण दक्षिण भागात पुढील काही दिवस पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाचा नाही तर उष्णतेचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. विशेषतः विदर्भात पारा सतत वाढताना दिसतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, ही स्थिती धोकादायक मानली जात आहे.