
भाजपने देशभरातील संघटनात्मक निवडणुकांचा वेग वाढवला..
नवी दिल्ली : भाजपने देशभरातील संघटनात्मक निवडणुकांचा वेग वाढवला असून, २० एप्रिलनंतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पक्षाच्या हायकमांडने सर्व राज्यांत लवकर निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अमित शहा, राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा आणि बी.एल. संतोष यांची उपस्थिती होती. या बैठकीत संघटनेतील फेरबदल, नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष निवडीवर चर्चा झाली.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये अजूनही प्रदेशाध्यक्ष निश्चित झालेले नाहीत. पंतप्रधान मोदींनी या निवड प्रक्रियेला गती देण्याचे संकेत दिले असून, पक्षाची संघटना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जे.पी नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला होता, मात्र आता नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. निवडणूक कार्यक्रमात नामांकन, मतदान (आवश्यक असल्यास) आणि अंतिम घोषणा यांचा समावेश असेल.
या वर्षी १० राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने, भाजप आगामी तीन वर्षांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.