डॉक्टर तारक आरोलकर यांची गोव्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी भेटी दरम्यान चर्चा…
स्थानिक लोकांच्या बेकायदेशीर आणि अनियमित घरांच्या समस्येबाबत विचार व्हावा

डॉक्टर तारक आरोलकर यांनी गोव्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी भेटी दरम्यान चर्चा
म्हापसा :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल रात्री डॉक्टर तारक आरोलकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की अचानक आलेल्या कामामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संवादानंतर एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करावा लागल्याने ते समारंभाला हजर राहू शकले नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत चारुदत्त पणजीकर व रोहिदास नाईक हे उपस्थित होते.
आपण दोन वेळा मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, परंतु व्यस्त कार्यक्रमांमुळे सहभागी होता आले नाही. त्यामुळेच आज मी खास तुमची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आलो आहे,” असे मंत्री नाईक यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान, डॉक्टर तारक आरोलकर यांनी गोव्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. विशेषतः स्थानिक लोकांच्या बेकायदेशीर आणि अनियमित घरांच्या समस्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आलदोना मतदारसंघात हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून, स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री व उत्तर गोवा खासदार या नात्याने आपण लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी मंत्री नाईक यांच्याकडे केली.
या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देताना, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच काही ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, या समस्येवर त्वरित एक ॲक्शन प्लॅन तयार करण्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.