Uncategorized

विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी स्वामी सेवामार्गातर्फे श्रीवज्रेश्वरी शक्तीपिठावर १८ मार्चला महासत्संग सोहळा..!

राष्ट्रहितासाठी घेण्यात येत असलेला आध्यात्मिक कार्यक्रम

विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी स्वामी सेवामार्गातर्फे
श्रीवज्रेश्वरी शक्तीपिठावर १८ मार्चला महासत्संग सोहळा..!

नाशिक : अखिल मानव जातीचे कल्याण,विश्वशांती आणि राष्ट्रहितासाठी दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे श्री क्षेत्र वज्रेश्वरी (भिवंडी)या शक्तिपीठावर मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात राष्ट्रीय महासत्संग सोहळा तथा १०८ कुंडात्मक श्री वज्रचंडी यज्ञ, श्री दुर्गासप्तशती पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन या सर्वोच्च आध्यात्मिक सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिशक्ती श्री पार्वती मातेचे रूप असलेल्या श्री वज्रेश्वरी मातेचा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथात आढळतो. हे देवस्थान अत्यंत शक्तिशाली, जागृत आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. येथील गरम पाण्याची कुंडेही प्रसिद्ध आहेत. या क्षेत्राचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे जनहितासाठी ही सेवा घेण्यात येत आहे. सेवामार्गातर्फे राष्ट्र, समाज आणि विश्वशांतीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या सर्वच उपक्रमांमध्ये सेवेकऱ्यांचा आजवर अभूतपूर्व प्रतिसाद लाभतो आहे. याच श्रृंखलेमध्ये श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे चाळीस एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर हा उपक्रम होत आहे. दि.१८ मार्च रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत भूपाळी आरती, श्री दुर्गा सप्तशती पठण,हवन, तर्पण, अशी पंच अंगात्मक सेवा अर्थात वज्रचंडी यज्ञ होईल. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत श्री चक्रराज श्री यंत्राची सेवा होईल. सकाळी साडेदहा वाजता महाआरती झाल्यावर परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. आणि या दिव्य वज्रचंडी यज्ञाची सांगता होईल.
राष्ट्रहितासाठी घेण्यात येत असलेला हा आध्यात्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई,ठाणे, पालघर, रायगड परिसरातील सेवेकर्यानी कंबर कसली आहे. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी नुकतेच मुलुंड, घाटकोपर ,कळवा, विरार ,पालघर ,भाईंदर , कोळसेवाडी, चाकण, राजे शिवाजीनगर आणि शिक्रापूर येथील सेवामार्गाच्या केंद्रांमध्ये मार्गदर्शन केले. गुरुपुत्र श्री मोरे यांनी ठिकठिकाणी केलेल्या मार्गदर्शनामध्ये विश्वशांतीसाठी श्री वज्रेश्वरी येथील उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.सेवा मार्गातर्फे सदैव मानवतावादी दृष्टिकोनातून बहुविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. अध्यात्मक केवळ नावापुरता असून विश्वशांती ,जनहित आणि राष्ट्रालाच सेवामार्गातर्फे प्राधान्य दिले जाते असे प्रतिपादन त्यांनी केले. श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथील १८ मार्चचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवेकऱ्यांकडून जय्यत तयारी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button