महाराजांच्या प्रशासनाची पारदर्शकता ठेवून गोव्याचे सरकार कार्यरत : मुख्यमंत्री
फार्मागुडी येथे आयोजित शिवजयंती उत्सवात

महाराजांच्या प्रशासनाची पारदर्शकता ठेवून गोव्याचे सरकार कार्यरत – मुख्यमंत्री डॉ. सावंत
फोंडा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त फार्मागुडी येथे आयोजित शिवजयंती उत्सवात मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाले. त्यांनी समारंभास संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या जीवनातून मिळणाऱ्या प्रेरणेवर प्रकाश टाकला.
मुख्यमंत्री सावंत यांनी शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य आणि सुराज्याच्या संकल्पनेचा उल्लेख करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे जनकल्याणासाठी आणि यशाच्या विकासासाठी एक आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील.”
यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक दाखले देत जनतेला त्यांच्या उपकारांची जाणीव करून दिली. तसेच, महाराजांच्या प्रशासनाची पारदर्शकता आणि लोकहिताची भावना अंगीकारून गोव्याचे सरकार कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्याच प्रेरणेने लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ऊर्जा मिळत राहो,” अशी प्रार्थना मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.
समारंभास विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.