मांगेली कुसगेवाडी येथे विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
महावितरणच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप, एकही अधिकारी रुग्णालयात हजर नाही

मांगेली कुसगेवाडी येथे विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
महावितरणच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप, एकही अधिकारी रुग्णालयात हजर नाही
दोडामार्ग. ता. १४ :- दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शुक्रवारी सकाळी विजेचा जोरदार धक्का लागून सख्ख्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मृत व्यक्तीचे नाव नागेश पांडुरंग गवस (३५) असून, त्यांचे मोठे भाऊ संदीप पांडुरंग गवस (४५) हे गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर गोवा जीएमसी, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. दोघेही कुसगेवाडीतील रहिवासी आहेत.
त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नागेश गवस यांना मृत घोषित केले. संदीप गवस यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यात हलवण्यात आले.
या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः मृत्यू पावलेल्या नागेश गवस यांच्या आईचा आक्रोश संपूर्ण परिसराला सुन्न करणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा होता. तिच्या हंबरडा फोडणाऱ्या किंकाळ्या पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दुसरीकडे, महावितरणच्या निष्काळजीपणावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही धोकादायक विद्युत वाहिन्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इतकी भीषण दुर्घटना घडूनही महावितरण विभागाचा एकही अधिकारी वा कर्मचारी रुग्णालयात हजर न राहिल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.