
झरेबांबर तिठा ते उसप तिठा रस्ता खड्डेमय
आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास बांधकाम विभागास घातला जाईल घेराव, पिकुळे सरपंच आपा गवस यांचा इशारा
दोडामार्ग :- झरेबांबर तिठा ते उसप तिठा हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या मार्गावरुन वाहने हाकताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागता. अनेकवेळा या रस्तावर पडलेले खड्डे बुजवावे अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र त्या मागणीकडे बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हटलं जात मात्र दोडामार्ग बांधकाम विभागाच्या बाबतीत बोलायला गेलं तर सरकारी काम आणि अनेक वर्षे थांब असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गावरून वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या मांगेली धबधबा सुरू झाल्याने या पर्यटन स्थळी अनेक पर्यटक या मार्गावरून ये- जा मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे निद्रिस्त अवस्थेत असलेल्या बांधकाम विभागाने येत्या आठ दिवसांत ते खड्डे बुजवावे व तो रस्ता वाहतुकीसाठी व्यावस्थित करावा अन्यथा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशारा पिकुळे ग्रामपंचायत सरपंच आपा गवस यांनी दिला आहे.