गोव्यातील वारसास्थळ घरे जपण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत

गोव्यातील वारसास्थळ घरे जपण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत…
पणजी :- गोवा प्रदेश काँग्रेस समिती गोव्याच्या वारसास्थळ घरे जपण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करते. गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची ही ओळख जपण्याच्या दिशेने हा निर्णय उशिरा का होईना, योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मात्र, सरकारने केवळ पोर्तुगीज काळातील घरेच नव्हे तर सर्व समाजांच्या वारशाचेही समसमान जतन करावे, ही आमची ठाम मागणी आहे असे प्रतिपादन अमरनाथ पणजीकर यांनी केले.
गोव्याच्या हिंदू समाजासह इतर सर्व समुदायांची पारंपरिक घरेही गोव्याच्या सामाजिक-सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग आहेत. ही घरे देखील वारसा संरक्षण योजनेत समाविष्ट करावीत. केवळ एका विशिष्ट कालखंडाचा वारसा जपल्याने गोमंतकीय अस्मितेचा खरा सन्मान होणार नाही.
गोव्याचा वारसा हा केवळ जुन्या इमारतींमध्ये सीमित नाही. गोमंतकीय ओळख ही आपली भूमी, नद्या, डोंगर, शेतजमीन, जंगल, जैवविविधता आणि पारंपरिक जीवनपद्धतींमध्ये खोल रुजलेली आहे. जर सरकारला खरोखर गोवा जपायचा असेल, तर संपूर्ण गोव्याला “जिवंत वारसा” म्हणून घोषित करावे आणि निसर्गाचा होणारा नाश थांबवावा अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
भाजप सरकारची लोभाश्रित आणि भ्रष्ट वृत्ती गोव्याचे भूमिपुत्र, पर्यावरण आणि वारसा विक्रीस काढत आहे. भाजप सरकारचा विकास नव्हे तर गोव्याच्या आत्म्याचा लिलाव सुरू आहे.
भाजपचे लोभाचे राजकारण आता सीमांच्या पलीकडे गेले आहे आणि जगभरातील भ्रष्ट वागणुकीचे सर्व विक्रम पार केले आहेत असा आरोप पणजीकर यांनी केला.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीची ठाम मागणी:
1. सर्व समाजांच्या पारंपरिक वारसास्थळ घरांचा वारसा योजनेत समावेश करावा.
2. जमीन रूपांतरण आणि निसर्गसंपत्तीच्या व्यापारी शोषणावर तत्काळ बंदी घालावी.
3. गोव्याच्या अस्मितेचे संरक्षण करणारी एक सखोल वारसा आणि पर्यावरण संरक्षण धोरण जाहीर करावी अशी मागणी पणजीकर यांनी केली.
फक्त जुन्या इमारती वाचवल्याने उपयोग नाही. गोव्याचा आत्मा आणि अस्मिता वाचवणे हेच खरे वारसा संरक्षण होय असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.