श्रद्धेचा उत्सव की निष्काळजी नियोजनाचा बळी..??

श्रद्धेचा उत्सव की निष्काळजी नियोजनाचा बळी..?? लईराई देवी जत्रेत चेंगराचेंगरी; सहा भाविकांचा मृत्यू, ८० पेक्षा अधिक जखमी; जबाबदारीचं बोट कोणाकडे..??
शिरगाव (गोवा) –शुक्रवारी रात्री शिरगाव येथे पार पडणाऱ्या लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात अचानक निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना उशिरा रात्री १ च्या सुमारास घडली. गर्दीत अडकलेले लोक घाबरले, गोंधळ उडाला आणि काही वेळातच परिस्थिती अनियंत्रित झाली.
मृत्यू झालेल्यांमध्ये महिला, आणि मुलगा यांचा समावेश असून, जखमींवर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि इतर जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
नियोजनशून्यता ठरली जीवघेणी
जत्रेला हजारो भाविक दरवर्षी उपस्थित राहतात, यावर्षीही गर्दीचा अंदाज होता. मात्र, यंदा संपूर्ण व्यवस्थापन ढासळल्याचे दिसून आले.
-स्थानिक स्वयंसेवकांची कमतरता
-पोलीस बंदोबस्त अपुरा
-रस्ते अरुंद आणि असुरक्षित
– गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना शून्य
अनेक भाविकांनी सांगितले की, एखाद्या संकटाच्या वेळेस बाहेर पडण्यासाठी कोणतेही आपत्कालीन मार्ग नव्हते. पथदिवेही अपुरे होते, आवाज प्रसारण व्यवस्था कोलमडली होती.
सरकारकडून आर्थिक मदत – पण जबाबदारीचं काय?
राज्य सरकारने तात्काळ मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आणि जखमींना मोफत उपचाराची घोषणा केली आहे. पण, इतकी मोठी दुर्घटना घडून गेल्यानंतर दोषी कोण? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, प्रशासन आणि देवस्थान समितीने किमान सुरक्षिततेची तयारी केली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती.
सामाजिक प्रश्न निर्माण
श्रद्धा आणि परंपरेला हादरा देणारी ही घटना अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करते.
उत्सवाचे नियोजन कोण करतं?
आपत्ती व्यवस्थापनाचे निकष का पाळले जात नाहीत?
धार्मिक उत्सवांमध्ये जबाबदारी निश्चित कशी केली जाते?
लोकांच्या भावना : “मृत्यू भरून न निघणारा”
“१० लाख मिळाले, पण आमचं माणूस परत मिळणार आहे का?” असा सवाल एका मृत व्यक्तीच्या नातेवाइकाने उपस्थित केला. अनेक नागरिक आणि स्थानिक पत्रकारांनी ही हृदयद्रावक भावना सोशल मीडियावर मांडली आहे.
पुढील वाटचाल खडतर
सध्या चौकशी समिती स्थापन केली असून, अहवाल दोन आठवड्यांत सादर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाविकांची सुरक्षा आणि धार्मिक उत्सवांसाठी स्पष्ट धोरण आखण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.