सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या

सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या
Pune Crime News: पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर आता या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक तपशील आता समोर येत आहे. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) हिचा तिच्या सासरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून वैष्णवीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या जाण्यानं पिंपरी चिंचवड मधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ने वैष्णवीच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी वैष्णवीचे वडिलांनी रडत रडत आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगितली
लग्न झाल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी सासरच्यांनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली. वैष्णवी दीड-दोन महिन्यांनी घरी आली की, म्हणायची पप्पा पैसे द्या. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला खूप टॉर्चर केले. तिला घालायचा साडी आणि ड्रेसही नसायचा. लग्नानंतर श्रावण महिन्यात गणपती-गौरी आले तेव्हा वैष्णवीच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. आम्ही त्या चांदीच्या गौरी त्यांना पुरवल्या. याशिवाय, लग्नात मी हगवणे कुटुंबाला चांदीची पाच ताटं दिली होती, या ताटांचे वजन साडेसात किलो इतके होते. तसेच 51 तोळे सोने आणि फॉर्च्युनर गाडीही आम्ही जावयाला दिली होती, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले. अधिका महिन्यात मी जावयाला सोन्याची अंगठीही दिली होती. वैष्णवी घरी आली की काहीतरी मागायची. मी दर दीड-दोन महिन्यांनी ती घरी आली की, 50 हजार ते 1 लाख रुपये तिला द्यायचो, असेही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.
वैष्णवी आणि तिच्या नवऱ्यात सतत खटके उडत होते. सासू तिला टॉर्चर करायची. तुला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही, असे म्हणायची. आम्ही याबाबत विचारल्यावर म्हणायची, आमच्याकडे तीन बाया कामाला आहेत, तिला काय काम पडतं. मात्र, आमची पाठ वळाली की वैष्णवीला पुन्हा त्रास दिला द्यायचा. वैष्णवी घरी आल्यानंतर आम्हाला हे सगळं सांगायची. तिच्या नणंदेने दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीला खूप मारलं होतं, तिच्या अंगावर थुंकली. दोघी मायलेकींनी तिला बालेवाडीपर्यंत गाडीतून टॉर्चर करत आणले. तेव्हा माझी मुलगी म्हणाली की, मी नदीत उडी टाकेन. इकडे घरी आल्यावर मी सासू, नणंद आणि जावयाचे पाय धरले. माझ्या मुलीचं चुकलं असेल तर माफ करा, असं मी म्हणालो. आम्ही मुलीचा संसार वाचवायला खूप प्रयत्न केले. दोन महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडे दीड लाखांचा मोबाईल मागितला, तोदेखील मी दिला, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले