रोहिदास भाटलेकर पेडणे तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष…
भंडारी समाजाचे आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार

रोहिदास भाटलेकर पेडणे तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष…
पेडणे : पेडणे तालुक्यातील श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या भंडारी समाजाच्या बैठकीत रोहिदास भाटलेकर यांची पेडणे तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीसाठी गोमंतक भंडारी केंद्रीय समाजाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना गोमंतक भंडारी केंद्रीय समाजाचे अध्यक्ष उपेंद्र गावकर यांनी सांगितले की, “राज्यातील ४० पैकी २६ ते ३० मतदारसंघांचा आम्ही आढावा घेतला आहे. समाजाच्या स्तरावर भंडारी समाजाची जातीय जनगणना करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील जबाबदारी त्या गावातील कार्यकर्त्यांना देण्यात येईल. यामधून गावागावात व तालुक्यांमध्ये भंडारी समाजातील लोकसंख्या किती आहे, याचा स्पष्ट व प्रामाणिक आकडा मिळेल. गोव्यातील दोन जिल्ह्यांमधील भंडारी समाजाची एकूण संख्या समजण्यास ही मोहीम उपयुक्त ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “आगामी निवडणुकीत भंडारी समाज पूर्ण ताकदीने उतरणार आहे. समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अधिकाधिक भंडारी समाजाचे आमदार विधानसभेत पाठवण्याचा आमचा निर्धार आहे. लवकरच सर्व तालुक्यांमध्ये समाजाची कार्यकारिणी मंडळ स्थापन करून संघटन मजबूत करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.”
सध्या भंडारी समाजाच्या नेतृत्वासाठी दोन गट समोरासमोर उभे आहेत. समाजाची एकत्रित शक्ती गोव्याच्या राजकारणात निर्णायक ठरू शकते, मात्र अंतर्गत मतभेद समाजाला कमकुवत करू शकतात, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भंडारी समाजाची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला भंडारी समाजाचे अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.