पणजी येथील बांदोडकर मैदानावर शनिवार १७ व रविवार १८ रोजी काजू महोत्सवाचे आयोजन…

पणजी येथील बांदोडकर मैदानावर शनिवार १७ व रविवार १८ रोजी काजू महोत्सवाचे आयोजन…
पणजी: गोवा वनविकास महामंडळाच्यावतीने कांपाल पणजी येथील बांदोडकर मैदानावर उद्या शनिवार १७ व रविवार १८ रोजी काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून शेकडो नागरिक व पर्यटक या महोत्सवाला उपस्थित राहणार असून, मैदानात तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
काजू महोत्सवाची तिसरी आवृत्ती असून, दरवर्षीप्रमाणे एप्रिलमध्ये तो आयोजित होणार होता. मात्र, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. आता तो नव्या तारखांनुसार १७ व १८ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन १७ मे रोजी सायं. ४.३० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध खात्यांचे मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा आणि सत्तरीच्या आमदार डॉ. दिव्या राणे असतील.
या दोन दिवसांच्या कार्यक्रमात काजू संस्कृतीवर आधारित प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनपर सादरीकरणे काजू उत्पादनांवर माहितीपर स्टॉल्स तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. काजू, फेणी व स्थानिक पारंपरिक खाद्यपदार्थाचे स्टॉल्स यावेळी मुख्य आकर्षण असणार आहेत.
राज्यातील काजू उद्योगाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार-प्रसार करणे, असा या महोत्सवाचा उद्देश आहे. गोमंतकीयांसाठी आणि पर्यटकांसाठी हा महोत्सव एक आगळा-वेगळा अनुभव ठरणार आहे.