Uncategorized
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत
पणजी : – शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरला आहे आणि राज्यात शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या दुर्घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली. बैठकीत राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलीस महासंचालक, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घोषणा केली की, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून महसूल सचिव संदीप जाकीस यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत खासदार सदानंद शेट तानावडे, पोलीस महानिरीक्षक वर्षा शर्मा, आमदार प्रेमेंद्र शेट आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा समावेश आहे.
“भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील,”असेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.