गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी शिवनगर कुर्टी-चांदोर येथे पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला… तात्काळ कारवाईची मागणी

गोवा काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी शिवनगर कुर्टी-चांदोर येथे पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला… तात्काळ कारवाईची मागणी
गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अमित पाटकर यांनी काल रात्री कुर्टी-चांदोर (शिवनगर टाकी) येथे घडलेल्या भयानक घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेत केपे पोलीस स्थानकातील एका कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर मद्यधुंद गुंडांच्या टोळक्याने हल्ला करून मारहाण केली. संबंधित पोलीस अधिकारी एका स्वतंत्र तक्रारीवर कार्यरत असताना त्यांच्यावर बिनधास्तपणे हा हल्ला करण्यात आला.
श्री पाटकर यांनी ही घटना “गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्णपणे कोसळलेल्या परिस्थितीचे भीषण उदाहरण” असे म्हटले असून, भाजप सरकारवर गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकीय संरक्षण मिळाल्यामुळे गुन्हेगार धाडसी होत असल्याचा ठपका ठेवला आहे.
या घटनेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना श्री पाटकर यांनी सांगितले की ही घटना भाजपचे आमदार श्री निलेश काब्राल यांचे कुर्टी-चांदोर मतदारसंघात घडली असून, हे गुन्हेगार त्यांच्या संरक्षणाखाली तर कार्यरत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला. “हा केवळ एका पोलीस अधिकाऱ्यावरचा हल्ला नाही — हा कायद्याच्या राज्यावरचाच हल्ला आहे. स्थानिक आमदार आणि भाजप सरकारच्या मौन आणि निष्क्रीयतेमुळे हे शक्य झाले आहे,” असे श्री पाटकर यांनी ठामपणे म्हटले.
गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने पुढील मागण्या केल्या आहेत:
• या हल्ल्यात सहभागी सर्व व्यक्तींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी
• गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यात झालेल्या अपयशाची स्पष्ट जबाबदारी स्वीकारावी
• या गुन्हेगारांना मिळणाऱ्या कोणत्याही राजकीय संरक्षणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी
श्री पाटकर यांनी पुढे म्हटले, “भाजपचे नेते पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षण करू शकत नसतील, तर ते गोमंतकीय जनतेचे संरक्षण कसे करणार? गोवा ही बिहार नाही — भाजपच्या राजवटीत राज्यात अराजकता पसरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.