भंडारी समाजात युवा नेते घडविणे ही काळाची गरज : डॉ. तारक आरोलकर

भंडारी समाजात युवा नेते घडविणे ही काळाची गरज : डॉ. तारक आरोलकर
म्हापसा (प्रतिनिधी) | भंडारी समाजाने क्रांतिकारी इतिहास समजून घेतल्यास आणि बहुजन संकल्पनेचा स्वीकार केल्यास, या समाजातून सक्षम नेतृत्व घडू शकते. समाजात सामाजिक नेतृत्व उभे न केल्यास खरे राजकीय नेतृत्व निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन म्हापशाचे नगरसेवक डॉ. ॲड. तारक आरोलकर यांनी केले.
‘बामसेफ’ (बॅकवर्ड ॲण्ड मायनोरिटी कम्युनिटीज एम्प्लॉइज फेडरेशन)तर्फे शनिवारी, १० मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत म्हापसा-दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. आरोलकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना डॉ. आरोलकर म्हणाले, “गोव्यात भंडारी समाजाची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे, तरीही या समाजाची स्थिती अत्यंत दुर्बल आहे. समाजाने स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर मुलांना चांगले शिक्षण देणे ही गरज आहे. आम्ही समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत.”
ते पुढे म्हणाले, “भंडारी समाजाच्या पहिल्या पिढीतील नेते आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दुसरी राजकीय फळी तयार करणे अत्यावश्यक आहे. नव्या पिढीने पुढे येऊन समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला पाहिजे. राजकारण हे समाजाच्या हितासाठी असले पाहिजे. देशाशिवाय आपले अस्तित्व नाही, म्हणून प्रथम देश, नंतर आपण, ही भूमिका महत्त्वाची आहे.”
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत करत सांगितले, “या माध्यमातून दुर्लक्षित जातींना न्याय मिळू शकतो. अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच रडत बसले नाहीत, तर अन्यायाविरोधात लढा दिला. त्यामुळे प्रत्येक समस्येला सामोरे जाण्याची तयारी हवी.”
शिबिरात ‘बामसेफ’चे गोवा राज्य प्रभारी डॉ. प्रमोद जमदाडे, ‘भा.मु.मो.म.सं. नवी दिल्ली’च्या अध्यक्षा ॲड. माया जमदाडे, ‘बामसेफ’चे प्रचारक सूरज शिंगाडे तसेच गोव्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात “केवळ सामाजिक कार्य करून समस्या सुटतील का, की स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून त्या सोडवाव्यात?” या विषयावरही सखोल चर्चा झाली