बेशिस्त खोदकाम, कोसळणारे रस्ते – भाजप गोवा सरकारचे ‘विकसित भारत’ हे एक धोकादायक भ्रांत – अमरनाथ पणजीकर

बेशिस्त खोदकाम, कोसळणारे रस्ते – भाजप गोवा सरकारचे ‘विकसित भारत’ हे एक धोकादायक भ्रांत – अमरनाथ पणजीकर
पणजी, गोवा – भाजप गोवा सरकारच्या बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराचे गंभीर प्रतिबिंब म्हणजे सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अक्षरशः धसका घेतलेला ढासळलेला चेहरा. गेल्या दोन दिवसांत एक ट्रक आणि एक बस कोसळल्याच्या घटनांनी ही भयंकर वस्तुस्थिती समोर आणली आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी सुरू असलेल्या बेजबाबदार आणि जीवघेण्या खोदकामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, जनतेच्या सुरक्षेची संपूर्णपणे पायमल्ली केली जात आहे असे पणजीकर यांनी म्हटले आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने या “अतिमहाभयंकर पाड” भाजपा सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे विकासाचे काम नाही, तर ‘विकसित भारत’च्या नावाखाली चाललेले व्यवस्थेचे आणि रस्त्यांचे विध्वंस आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नाहीत, नागरिकांचे जीव धोक्यात घालून भाजप सरकार नुसते टाळं बंद करून बसले आहे.
“सरकारने वेळेवर हे रस्ते का दुरुस्त केले नाहीत? ‘मिशन टोटल कमिशन’वरील वादामुळे ही दिरंगाई झाली आहे का? की हे प्रशासनाचे साफ अपयश आहे? कारण काहीही असो, त्याची किंमत गोमंतकीय जनतेला आपल्या जीवावर बेतून चुकवावी लागत आहे,” असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.