आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
आंबोली :- आज सकाळी आंबोली घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलीस प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीमुळे परिस्थिती पूर्ववत झाली. पूर्वीच्या वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आले होते. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागली होती. पण पोलिसांनी तातडीने दरड हटवण्याचे काम हाती घेतल्याने अवघ्या काही तासांतच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.
आज सकाळी अचानक दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचले होते. ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा परिणाम म्हणून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे, रामदास जाधव, मनीष शिंदे आणि होमगार्ड आनंद बरागडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने कोणताही विलंब न करता दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. जेसीबी आणि इतर साधनांच्या मदतीने रस्त्यावरील माती आणि दगड बाजूला करण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे काही तासांतच रस्ता साफ होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.