राज्यातील पहिली ‘रो-रो’ फेरी सेवा प्रायोगिक तत्वावर…

राज्यातील पहिली ‘रो-रो’ फेरी सेवा प्रायोगिक तत्वावर...
पणजी : गोव्यातील जलवाहतुकीच्या आधुनिकिकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, राज्यातील पहिली ‘रो-रो’ फेरी सेवा प्रायोगिक तत्वावर चोडण फेरीमार्गावर सुरु करण्यात येणार आहे. या सेवेसाठी आवश्यक फेरीधक्का तयार करण्यात आला असून, सेवा पुढील आठवड्यात प्रवाशांसाठी कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.फळदेसाई म्हणाले की, ही रो-रो फेरी सेवा गोव्यातील जलवाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारी ठरणार आहे. सध्या प्राथमिक स्वरूपात चाचणी पद्धतीने ही सेवा चोडण फेरीवर सुरु करण्यात येणार असून, त्यानंतर अनुभवाच्या आधारे इतर मार्गांवरही ही सेवा सुरु करण्याचा विचार आहे.या सेवेमुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, सध्या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीचा भार काही प्रमाणात कमी होईल. वाहनांसह प्रवाशांची जलमार्गे वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि इंधनसक्षम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे स्थानिक विकासालाही चालना मिळेल, तसेच राज्याच्या पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाला बळ मिळणार असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी नमूद केले.