
लईराई दुर्घटना : जखमी रुग्णांची आरोग्यमंत्र्याकडून विचारपूस; उपचारांची घेतली माहिती..
पणजी:शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या भाविकांची गोमेकॉ (GMC) रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज भेट दिली. रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेतली.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, “सध्या गंभीर वर्गवारीत ठेवण्यात आलेल्या ५ रुग्णांपैकी ३ रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. मात्र उर्वरित २ रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर असली तरी स्थिर आहे. डॉक्टरांची टीम सतत त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे.”
या दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री दोघेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जखमी रुग्णांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत तत्परतेने पुरवली जात आहे.
या घटनेनंतर शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यात अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित केली आहे.