पाकिस्तान नागरिकांनी तत्काळ देश आणि महाराष्ट्र सोडावा, नाहीतर….

पाकिस्तान नागरिकांनी तत्काळ देश आणि महाराष्ट्र सोडावा, नाहीतर…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गरजले…
मुंबई : दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या २६ जणांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला जशाच तसे उत्तर द्या, अशी लोकांची भावना आहे. तसेच भारतात जे पाकिस्तानची लोकं आहेत, त्यांना देशातून पाकिस्तान पाठवा, या मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, पाकिस्तान नागरिकांनी तत्काळ देश आणि महाराष्ट्र सोडावा, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, “भारताने अनेक पाकिस्तानचा नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. भारत सरकारने पाकिस्तानमधील नागरिक जे भारतात राहतात, त्यांचा व्हिसा रद्द केला आहे. दरम्यान, देशात आणि महाराष्ट्रात पाकिस्तानातील नागरिक कुठे-कुठे राहत आहेत. याचे आम्ही मॉनेटरिंग करत आहोत. तपास करत आहोत. यात जे कुणी दिरंगाई करेल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पाकिस्तानचा एकही नागरिक या देशात किंवा महाराष्ट्रात राहणार नाही. याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतोय. त्यांनी तात्काळ भारतातून जावे, असे आदेश सरकारने दिले आहेत.”
सरकार काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात : पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “कलाकार, अभिनेत्यांविषयी सहानुभूती नाही. भारतात जे पाकिस्तानचे कलाकार आहेत किंवा जे क्रिकेटर आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात अजिबात सहानुभूती नाही आहे. तसेच, काश्मीरमधून महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना परत आणलं आहे. जे तिथे घाबरलेले आहेत, त्यांना परत आणतोय. त्याची प्रक्रिया सुरु आहे. आणि ज्यांची तिथे राहण्याची सोय आहे, किंवा जे स्वत:हून येणार आहेत. त्यांचीही विचारपूस केली आहे. सरकार काश्मीरमधील पर्यटकांच्या संपर्कात आहे, जे तिकडे पर्यटक अडकले आहेत. त्यांनाही सरकार लवकरच घेऊन येईल”, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.