अमित पाटकर हटाओ, गोवा में कांग्रेस बचाओ… खेमलो सावंत…

अमित पाटकर हटाओ, गोवा में कांग्रेस बचाओ… खेमलो सावंत…
पणजी :- गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या विरोधात पक्षातील काही नेते पुन्हा बंडखोरीच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काल साखळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते खेमलो सावंत यांनी पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींना आवाहन करत म्हटले की, “त्वरित अमित पाटकर यांना पदावरून हटवले नाही, तर गोव्यात उरले-सुरलेले काँग्रेसचे अस्तित्वही संपून जाईल.”
सावंत यांच्या मते, पाटकर यांच्या मनमानी आणि अपारदर्शक कार्यपद्धतीमुळे काँग्रेसची गोव्यातील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते नाराज असून त्यांना काम करण्यासाठी संधीच मिळत नाही. निवडक काही लोकांनाच पाटकर जवळ ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पक्षात वाढत असलेला असंतोष लवकरात लवकर लक्षात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने योग्य पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी होती.
यापूर्वीही पक्षांतर्गत बंडाचे वातावरण निर्माण झाले होते. काही नेत्यांनी अमित पाटकर यांच्या कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. काही काळाने हा विषय मिटला आणि काँग्रेसचे कामकाज पुन्हा सुरू झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, यामुळे असंतोष पुन्हा उफाळून आला आहे.
दक्षिण गोव्यात काँग्रेसला मिळालेली जागा ही कम्युनल मतांच्या एकत्रित ताकदीमुळे मिळाली, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामागे काँग्रेसची रणनीती किंवा संघटनशक्ती नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पक्ष जर तळागाळात न्यायचा असेल, तर सर्व मतदारसंघांमध्ये जबाबदाऱ्या वाटून देत संघटन मजबूत करावी लागेल, अशी अनेक नेत्यांची भावना आहे. अनेक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत करून पक्षासाठी झटले, परंतु निवडणुकीच्या वेळेस तिकीट काही दुसऱ्यांनाच देण्यात आल्याने त्यांचे मनोबल खच्ची झाले आहे.
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाविरोधात काम करणाऱ्यांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला दिला होता, तसेच त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की अशा लोकांवर कारवाई केली जाईल. मात्र, अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे की पक्षातील कार्यकर्ते कमी होत असताना ही भूमिका पक्षाला नुकसानकारक ठरू शकते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बूथवर बसवायला काँग्रेसकडे कार्यकर्तेच नव्हते, हे वास्तव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येही काँग्रेसबाबत नाराजीचे वातावरण आहे. काही नागरिकांनी सांगितले की, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी शपथ घेतली होती की ते निवडून आल्यावर पक्ष सोडणार नाहीत. पण नंतर अनेकांनी पक्षत्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला. “शपथ देवाची घेऊन, निवडणूक काँग्रेस मधून लढायची आणि मग देवाशी संपर्क साधून भाजपमध्ये जायचं – ही प्रवृत्ती आम्हाला पटत नाही,” असे काही नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले.
या विषयावर काही नेत्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. एक नेते म्हणाले, “खरी परिस्थिती जनतेसमोर आहे. आम्ही आता काहीही बोलणार नाही. देवच पक्षाची काळजी घेईल.” कोणता देव ते तुम्ही ठरवा.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, गोव्या मध्ये तिसऱ्या आघाडीच्या निर्माणाचीही शक्यता व्यक्त होत आहे. काही दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये घमासान युद्धाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
हा संघर्ष वरून जितका साधा वाटतो, तितका तो नाही. काँग्रेसमध्ये एक अंतर्गत मोठे युद्ध सुरू झाले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही