आयपीएल बॅटिंग प्रकरणात गुंतलेल्या 40 जणांना अटक 45 लाखाचे साहित्य जप्त…

आयपीएल बॅटिंग प्रकरणात गुंतलेल्या 40 जणांना अटक 45 लाखाचे साहित्य जप्त…
पणजी : देशभरातआयपीएलची धूम सुरू असताना गोव्यात मात्र याचा काळी बाजू समोर येत आहे. राज्यात आयपीएल बेटिंगचा पसारा वाढत असून, यामधून झालेली आर्थिक उलाढाल तब्बल करोडो रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आणि पुढे ती वाढत जाणार आहे, अशी माहिती आहे.
गेल्या पाच दिवसांत गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी राज्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक येथील तब्बल ४४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे मोबाईल, लॉपटॉप, गेमिंग साहित्य, चेकबुक, पासबुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बॅटिंगसाठी या टोळीकडून भाड्याने निवासी खोल्या किंवा मोठ्या इमारतींची निवड केली जात असून, बांबोळी परिसरातील एका आलिशान व्हिलामध्ये बेटिंगसाठी बेकायदा ‘कॉर्पोरेट हब’ उभारण्यात आला होता. या ठिकाणी ३० पेक्षा अधिक लोक सतत काम करत होते. सूत्रांनुसार ह्या टोळ्या गेल्या चार महिन्यांपासून सक्रिय असून त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० सामने, फुटबॉल सामने आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही बेटिंग लावले होते.
साहित्याची पडताळणी सुरू :
या प्रकरणी गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या लॅपटॉप्स आणि मोबाईल डिव्हाइसेसमधील डेटा तपासला जात आहे. अधिकृत रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ती करोडोमध्ये असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राज्यात अशा अवैध बेटिंग रॅकेट्सचा वाढता प्रभाव पाहता, भविष्यात गोवा हे अशा प्रकारच्या कारवायांसाठी केंद्रबिंदू ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी चिंता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.