मुंबईत 17 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून तीची हत्या करण्याचा प्रयत्न..

मुंबईत 17 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून तीची हत्या करण्याचा प्रयत्न..
शब्द मिडिया – अंधेरीतील एमआयडीसी परिसरामध्ये रविवारी एका 30 वर्षांच्या माणसाने एका 17 वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं. या घटनेनंतर ही मुलगी 60 टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
पीडित मुलगी ही दहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती अंधेरी पूर्व भागामधील रहिवासी आहे. तिला जाळून मारुन टाकण्याचा प्रयत्न करणारा आरोपीही तिच्याच परिसरात राहणारा आहे. गेल्या दिड वर्षापासून दोघं एकमेकांना खूपदा भेटायचे आणि एकत्र वेळ घालवायचे. त्या दोघांना स्थानिकांनी अनेक वेळा एकत्र बघितलं. काही जणांनी त्या मुलीच्या पालकांनाही याविषयीची माहिती दिली. मुलीच्या पालकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीला न भेटण्याचा सल्ला दिला. रागाच्या भरात मग आरोपीने तिला मग जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपी 2 मार्चला रात्री साडेदहाच्या सुमारास मुलीच्या घराजवळ आला. त्याने तिला घराबाहेर बोलावलं. दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने बाटलीत आणलेलं पेट्रोल तिच्या अंगावर टाकून आग लावली. स्थानिकांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती सध्या गंभीर आहे. आरोपीचे हात भाजल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. पीडिता लवकरात लवकर बरी व्हावी, म्हणून सगळे जण प्रार्थना करत आहेत.