
कुख्यात गैंगस्टर पोलीस चकमकीत ठार
कुख्यात गैंगस्टर अमन साव पोलीस चकमकीत ठार झाला आहे. खून प्रकरणात अटकेत असलेल्या अमनला पोलीस रायपूरहून रांचीला आणत असताना पलामू जिल्ह्यात चकमक झात्यांचे वृत्त आहे.
झारखंडमधील कुख्यात गैंगस्टर अशी अमन सावची गुन्हेगारी क्षेत्रात ओळख होती. रांचीतील बरियातू येथे कोळसा व्यावसायिकावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो रायपूर तुरुंगात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हजारीबागमधील ‘एनटीपीसी’च्या डीजीएमच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी अमन साहू याला रांची येथे आणले जात होते. चैनपूर आणि रामगड पोलिस ठाण्यादरम्यान असलेल्या अंधारी धोधा येथे अमन साव टोळीतील गुंडांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. यादरम्यान पोलिसांच्या गाडीला अपघात झाला.
अपघातानंतर अमनने पोलिसांचे शस्त्र हिसकावून घेतले. तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने गोळीबार सुरू केला. पोलिस पथकानेही दिलेल्या प्रत्युत्तरात अमन जागीच ठार झाला. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पलामू पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.