कोकणात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
वर्षातील मार्च महिना सर्वात उष्ण असणार हवामान विभागाची माहिती

कोकणात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज
शब्द मीडिया :- राज्यातील तापमानात मार्चच्या सुरुवातीला घट झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील घट बघायला मिळत आहे. पण कोकणात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.सोलापूरमधील तापमानात अंशतः घट झाल्याने तेथील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये आज 2 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पण पुढील काही दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
सातारा आणि सांगलीमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 2 मार्चला दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.हवामान विभागाने कोकण व मुंबईला उष्णतेचे इशारे दिले होते. आता उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला आहे. येत्या तीन ते चार दिवसात कोकण विभागात साधारण असेच हवामान असेल. रनगिरी आणि सिंधुदूर्गात सर्वाधिक उष्णता जाणवेल असं हवामान विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात फारसा बदल नाही.
या वर्षातील मार्च महिना सर्वात उष्ण असणार… हवामान विभागाने या वर्षातील मार्च महिना सर्वात उष्ण असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे, तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.