डॉ. तारक आरोलकर यांनी भंडारी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५००० चौरस मीटर जमीन केली दान
शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा दयानंद मांद्रेकर यांनी केली

डॉ. तारक आरोलकर यांनी भंडारी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५००० चौरस मीटर जमीन केली दान
म्हापसा : म्हापसा येथील प्रगती हॉलमध्ये भंडारी समाजाच्या वतीने डॉ. तारक आरोलकर यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. आरोलकर यांनी भंडारी समाजाच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, समाजातील अनेक कुटुंबे अजूनही आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, तसेच युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आरोलकर यांनी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मोठी घोषणा करत ५००० स्क्वेअर मीटर जमीन भंडारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद दिली.
कार्यक्रमात व्यासपीठावर माजी मंत्री दयानंद मांद्रेकर आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते. मांद्रेकर यांनी भंडारी समाजातील नवीन राजकीय नेतृत्व उभारण्याची गरज असल्याचे नमूद केले. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दुसऱ्या फळीतील राजकीय पिढी घडवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आगामी काळात ते शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
माजी आमदार दिलीप परुळेकर यांनीही समाजाच्या एकत्रीकरणावर भर देत, भंडारी समाजाने संघटित होऊन स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची गरज असल्याचे सांगितले. समाज आतापर्यंत कधीही संघटित झाला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सत्कार समारंभाला भंडारी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता. समाजाच्या चर्चेतून असे स्पष्ट झाले की, भंडारी समाजाला आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि डॉ. तारक आरोलकर यांनी हे नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी समाजातून होत आहे.
कार्यक्रमाला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी नगराध्यक्षा वायंगणकर, नगरसेविका कोरेगावकर, माजी उपनगराध्यक्ष संदीप हरमलकर, नगरसेवक विकास आरोलकर, माजी आलदोना सरपंच चारुदत्त पणजीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भंडारी समाजाने एकसंघ होऊन पुढे जाण्याची गरज अधोरेखित झाली. डॉ. तारक आरोलकर हे समाजाच्या उन्नतीसाठी सक्षम नेतृत्व देतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसून आली. भविष्यात भंडारी समाजासाठी ते कशाप्रकारे कार्यरत राहतील, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आमंत्रित केले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक बोलावलेल्या मीटिंगमुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या ऑडिओ संदेशामार्फत डॉ. तारक आरोलकर यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले. “तारक हा दिलदार व समाजासाठी झटणारा नेता आहे. भंडारी समाजातील भरारी घेणारा हा एक उभरता नेता आहे. त्यांची राजकीय कारकीर्द अशीच यशस्वीरित्या पुढे जात राहावी,” अशी प्रार्थना करत त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले.