
“विष्णू स्मृती” या कार्यक्रमातून विष्णू सूर्या वाघ यांना आदरांजली
पणजी: दिवंगत कवी, लेखक, नाटककार आणि विचारवंत विष्णू सूर्य वाघ यांच्या साहित्यिक आणि सांगीतिक योगदानाला आदरांजली म्हणून विष्णू स्मृती हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन विष्णू सूर्या वाघ फाउंडेशनच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता संस्कृती भवन, प्याट्टो-पणजी येथे करण्यात आले.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायक निलेश शिंदे यांनी विष्णू वाघ यांनी लिहिलेली गीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणाला संगीतकार रोहित खांडोलकर आणि संजय नार्वेकर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम मांद्रेकर यांनी केले.
या विशेष सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. तारक आरोलकर (नगरसेवक, म्हापसा नगरपालिका), मुख्य वक्ते प्रा. प्रकाश वजरीकर (खांडोळा कॉलेज), तसेच अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद माटे (उपसंचालक, कला आणि संस्कृती विभाग) उपस्थित होते. त्यांच्यासोबत श्रीमती वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
विष्णू वाघ: एक बंडखोर कवी आणि समाजप्रबोधनकार
कार्यक्रमात बोलताना प्रा. प्रकाश वजरीकर म्हणाले, “विष्णू वाघ हे केवळ कवी नव्हे, तर एक बंडखोर साहित्यिक होते. त्यांच्या लेखनातून समाजातील असमानता आणि दुर्लक्षित घटकांविषयीची खदखद स्पष्ट जाणवते. त्यांच्या साहित्याचे वाचन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये सामाजिक क्रांतीची ठिणगी नक्कीच चेतवली जाते.”
प्रमुख पाहुणे डॉ. तारक आरोलकर यांनी आपल्या भाषणात विष्णू वाघ यांच्या साहित्यिक कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “गोव्यात विष्णू वाघ यांच्यासारखा कवी आणि नाटककार पुन्हा होणे नाही. त्यांच्या शेकडो नाटकांमधून आणि बंडखोर कवितांमधून लोकांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या लेखणीची तुलना सूर्यप्रकाशासोबतच करता येईल, कारण ती सदैव मार्गदर्शन करणारी आहे.”
डॉ. मिलिंद माटे यांनी ‘शूद्र सुतक’ या काव्यसंग्रहाचा उल्लेख करत म्हटले, “हा केवळ एक काव्यसंग्रह नसून, पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करणाऱ्या समाजाला दिलेले एक स्फूर्तीदायक आव्हान आहे. विष्णू वाघ यांच्या क्रांतिकारी विचारधारेची खरी ओळख यातून होते.”
कार्यक्रमाच्या शेवटी ताम्हणकर सर यांनी सर्व मान्यवर आणि विष्णू रसिकांचे आभार मानले. ते म्हणाले, “अशा कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
‘विष्णू स्मृती’ हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या अमूल्य साहित्यिक योगदानाचा गौरव होता आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी कायम राहील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.