शिवजयंती उत्सव म्हणजे गोव्याचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक..
शिवजयंती आता गोव्याच्या संस्कृतीशी घट्ट जोडली गेली आहे

आज संपूर्ण गोव्यात शिवजयंती उत्सव म्हणजे गोव्याचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक..
शब्द मिडिया :- शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्वत्र सणासारखे वातावरण पाहायला मिळत आहे असे मत डॉ. तारक आरोलकर यांनी भाषिक व्यक्त केले.
डॉ. तारक आरोलकर म्हणाले, “गोव्याची आणि महाराष्ट्राची संस्कृती एकच आहे. जसे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे द्योतक आहेत, तसेच ते गोव्याच्याही संस्कृतीचा एक भाग आहेत. आज काही लोक गोव्यात मराठी आणि कोकणी यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोकणी ही भाषा मराठीच्या संस्कारातून घडली आहे. दोन्ही भाषा परस्परांशी जोडलेल्या आहेत आणि त्या वेगळ्या करण्याची कोणाचीही हिम्मत नाही. त्यामुळे अशा वादात लक्ष घालण्यापेक्षा गोव्याच्या सर्वांगीण विकासावर भर द्यायला हवा.”
- ते पुढे म्हणाले, “भाऊसाहेब बांदोडकर यांनी मराठीतून शाळा सुरू केल्या आणि त्यातून शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी-कोंकणीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा होऊ नये. शिवजयंती आता गोव्याच्या संस्कृतीशी घट्ट जोडली गेली आहे आणि आजच्या उत्सवाने ते सिद्धही झाले आहे. महाराष्ट्र आणि गोवा ही वेगवेगळी राज्ये असली, तरी सांस्कृतिक दृष्ट्या आम्ही एक आहोत.”
शिवरायांवर टिकात्मक विधान करणाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले, “ज्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास समजत नाही, ते त्यांच्यावर टीका करतात. पण अशा लोकांनी हे लक्षात ठेवावे की त्यांना महाराजांवर बोलण्याची लायकी आहे का, याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. आजचा गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये हिंदू धर्म, मंदिर, संस्कृती वाचली, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान आहे. त्यामुळे गोव्यातील प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आणि शिवजयंती भविष्यातही मोठ्या जल्लोषात साजरी व्हावी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.”
गोव्याच्या विविध भागांत शिवजयंतीनिमित्त मिरवणुका, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोवेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिवरायांना अभिवादन केले.