म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव पत्रकार परिषदेतून आरोग्य मंत्र्यावर टीका
डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये अजूनही कामचोरपणा

म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुविधांचा अभाव पत्रकार परिषदेतून आरोग्य मंत्र्यावर टीका
म्हापसा : काँग्रेस पक्षाने नॉर्थ गोवा जिल्हा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे विजय भिके यांनी मंत्री राणे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी केवळ “फोटोसेशन”साठी नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला भेट दिली असल्याचा आरोप केला.
विजय भिके म्हणाले, “मंत्री राणे यांनी तीन कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाच्या कारणावरून कामावरून काढून टाकले, त्यावर आम्हाला काही म्हणायचे नाही. पण हॉस्पिटलमधील मूळ समस्या जशाच्या तशाच आहेत. मंत्री महोदयांनी रात्रीच्या वेळी हॉस्पिटलला भेट द्यावी, म्हणजे त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल. आजही हॉस्पिटलच्या आवारात अंधार आहे, नागरिकांना पार्किंगची मोठी समस्या भेडसावत आहे. हॉस्पिटलचे सांडपाणी लोकांच्या घरात घुसत आहे, याकडे मंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे. फक्त फोटो काढून जातील, की समस्या सोडवतील?” असा सवाल भिके यांनी उपस्थित केला. हॉस्पिटलमध्ये पुरेशी वाय-फाय सुविधा नाहीत, स्टाफच्या हलगर्जीपणाबद्दल वारंवार तक्रारी येत आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंत्री काल भेट देऊन गेले, पण पुढे काय? आजही हॉस्पिटलच्या समस्या जशाच्या तशा आहेत, कोणताही ठोस बदल झालेला नाही,” असा आरोप त्यांनी केला.
सरकारी सेवेत सुधारणा होत नसतील, तर सरकारचेच खाजगीकरण करा, निदान लोकांना महागडे का होईना पण चांगली आरोग्यसेवा तरी मिळेल, असे टोकाचे मतही भिके यांनी व्यक्त केली.
विजय भिके यांनी आरोग्य विभागावर गंभीर आरोप करत सांगितले की, “सिटीस्कॅन मशीन गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे, तर सोनोग्राफी मशीन सात महिन्यांपासून बंद आहे. यामागचे कारण काय? मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सचा फायदा व्हावा म्हणूनच ही यंत्रे बंद ठेवली आहेत का? याचे उत्तर मंत्री राणे यांनी द्यावे.”
या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने आरोग्य सुविधांच्या समस्यांबाबत सरकारला धारेवर धरले असून, लवकर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.