दिगंबर कामत यांना मिळणार मंत्री पद..आमदार मायकल लोबोही शर्यतीत, मार्चमध्ये होणार फेरबदल
सध्या आमदार कामत आणि लोबो यांच्या नावाची चर्चा

दिगंबर कामत यांना मिळणार मंत्री पद..आमदार मायकल लोबोही शर्यतीत, मार्चमध्ये फेरबदल
पणजी : भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष पुढील आठवड्यात दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते राज्यातील विविध प्रश्न, भाजप संघटन आणि बहुचर्चित व प्रतीक्षेत असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा करतील अशी माहिती आहे.
या फेरबदलात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पुढील महिन्यात येणाऱ्या वाढदिवसाची गिफ्ट मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून या मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये माजी मंत्री मायकल लोबो ही असून त्यांचाही विचार सुरू झाल्याची माहिती आहे.काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारपैिकी कामत यांना मंत्रीपद मिळणार हे अगोदरच ठरले होते.
मात्र भाजपने लोकसभेच्या गणिताला प्राधान्य देत आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद दिले. त्यावेळी कामत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र केवळ सिक्वेरा यांनाच मंत्रिपद देण्यात आले होते.
आता पुन्हा या चर्चा सुरू झाल्याने कामत यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे या आठ आमदारांच्या गटाचे नेतृत केलेल्या मायकल लोबो यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मध्यंतरी त्यांची पत्नी दिलायला लोबो यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. याबरोबर संकल्प आमोणकर यांचेही नाव चर्चेत होते. सध्या आमदार कामत आणि लोबो यांच्या नावाची चर्चा सुरु आहे..