Uncategorized

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणेतर्फे शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम

शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम¯

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणेतर्फे शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम¯

शब्दशारदा :- ​ अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणेतर्फे शिवजयंती निमित्त पत्रकार परिषद नुकतीच पेडणे येथे संपन्न झाली. सदर पत्रकार परिषदेस अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणेचे अध्यक्ष ॲड. श्याम शेट्ये तसेच सचिव व केंद्रीय समिती सदस्य ॲड. अमित सावंत, कार्यक्रम प्रमुख ॲड. विजय परब, केंद्रीय समिती सदस्य श्री. शंकर महाले, इतर सदस्यांमध्ये सौ. नयनी शेटगांवकर, शशी महाले, मकरंद परब, विनायक महाले, प्रदीप परब आदी सदस्य उपस्थित होते.

​ यंदा प्रथमच अगोक्षम समाज पेडणे तर्फे सात दिवस शिवजयंती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजातील विविध सदस्यांचे सन्मान सोहळे, एकपात्री अभिनय स्पर्धा व एकूण ६ नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. श्याम शेट्ये यांनी दिली. पुढे पत्रकार परिषदेत संबोधित करताना सचिव तथा केंद्रीय समिती सदस्य ॲड. अमित सावंत यांनी सात दिवस चालणार्‍या विविध कार्यक्रमांची सविस्तरपणे महिती दिली ज्यामध्ये कार्यक्रमांस लाभणारे विविध मान्यवर व नाट्यप्रयोग व एकपात्री अभिनय स्पर्धा याविषयी विस्तृतपणे माहिती देण्यात आली.

​ याप्रसंगी प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेतील महिती पुढीलप्रमाणे, बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक सावंतवाडा मांद्रे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी, प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. भाग्यश्री चद्रकांत शेट्ये, कार्यक्रम अध्यक्ष श्री. सुहास फळदेसाई, प्रमुख वक्त्या सौ. पौर्णिमा राजेंद्र केरकर, खास आमंत्रित मान्यवरांमध्ये जिल्हा पंचायत सदस्य श्री. सतिश शेटगांवकर, सचिव व केंद्रीय समिती सदस्य ॲड. अमित सावंत, पंच सदस्य श्री. किरण सावंत, शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे श्री. सखाराम सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्यात पेडणे तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. व तद्नंतर सायं ठिक ७ वा. श्री. भूमिका आदिमाया महिला मंडळ सावंतवाडा मांद्रे प्रस्तुत संगीत “प्रिती संगम” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ वा श्री भूमिका देवस्थान सावंतवाडा मांद्रे येथे पेडणे तालुका मर्यादित एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तेसेच याप्रसंगी पेडणे तालुक्यातील देवस्थान अध्यक्षांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राज्यसभा खासदार श्री. सदानंद शेट तानावडे, कार्यक्रम अध्यक्ष तथा अगोक्षम समाज केंद्रीय समिती अध्यक्ष श्री. सुहास फळदेसाई, खास आमंत्रित मान्यवरांमध्ये गावकरीचे संपादक श्री. किशोर नाईक गांवकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री. सतिश शेटगांवकर, सचिव तथा केंद्रीय समिती सदस्य ॲड. अमित सावंत, पंच सदस्य श्री. किरण सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ५ वा श्री देवी सातेरी देवस्थान चांदेल येथे पेडणे तालुक्यातील नाट्य कलाकारांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. तसेच हिंदवी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे माजी मुख्यमंत्री. श्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अगोक्षम समाज केंद्रीय समिती अध्यक्ष श्री. सुहास फळदेसाई, खास आमंत्रित मान्यवरांमध्ये नावेलीचे आमदार श्री. उल्हास तुयेकर, डिचोलीचे माजी आमदार श्री. नरेश सावळ, सरपंच श्री. तुळशीदास गावस, उप-सरपंच सौ. रुचिरा मळिक, पंच सदस्य श्री. प्रजय मळिक, सातेरी देवस्थान चांदेलचे अध्यक्ष श्री. आनंद गावस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तद्नंतर श्री दुर्वांकुर कला केंद्र हरमल प्रस्तुत “इथे ओशाळला मृत्यू” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

तसेच, शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ७ वा. श्री देवी सातेरी देवस्थान इब्रामपूर येथे रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स क्लब तळर्ण प्रस्तुत “महाराणी पद्मिनी” हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे. रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ७ वा श्री देव दाडोबा देवस्थान मोरजी येथे नाट्यसंपदा गोवा प्रस्तुत “ आकाशमिठी” हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तसेच, सोमावर दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ७ वाजता श्री देवी सातेरी देवस्थान, मराठवाडा मांद्रे येथे श्री देवी भगवती क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ पेडणे गोवा प्रस्तुत “ तो मृत्युंजय एक” हा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.

शिवजयंती कार्यक्रमाच्या हिंदवी नाट्य महोत्सवातील शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं ७. वा श्री देव साळेश्वर देवस्थान पेठेचावाडा कोरगांव येथे श्री ओंकार थिएटर्स पेडणे प्रस्तुत “रायगडाला जेव्हा जाग येते” हा शेवटचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे व तद्नंतर हिंदवी नाट्य महोत्सव व एकपात्री अभिनय स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, अगोक्षम समाज केंद्रीय समिती अध्यक्ष श्री. सुहास फळदेसाई, खास आमंत्रित मान्यवरांमध्ये माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमांकांत खलप, केंद्रीय समिती सदस्य श्री. शंकर महाले, पंच सदस्य श्री. लौकीक शेट्ये, श्री देव साळेश्वर देवस्थान पेठेचावाडा कोरगांवचे अध्यक्ष श्री. रामा शेट्ये उपस्थित राहणार आहेत.

सदर उत्सवातील एकपात्री अभिनय स्पर्धा व हिंदवी नाट्य महोत्सवातील कलाकारांसाठी कुठलेही जातीय बंधन असणार नाही व सदर कार्यक्रमास रसिक- प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीतर्फे करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button